Sunday 7 May 2017

क्षण..

आज तुला जाऊन बरोबर सात दिवस झाले काही लिहावसं वाटलं म्हणून तुझ्यासाठी..

काही वर्षांपूर्वी दोन ओळी सुचलेल्या त्या अशा कि

क्षण असा जो ठेविला आहे मी जपुनी
येईल का योग तो परत जगण्याचा जुळुनी..??

मलाच सुचलेलं वाक्य मलाच आज  हास्यास्पद वाटत आहे पण काल प्रकर्षाने या वाक्याची आठवण आणि त्याबरोबरीने अनेक सुंदर, गमतीशीर क्षणांची आठवण झाली. कारण पण तसचं होतं. दुपारी दुकानात असताना एका अनोळखी नंबर वरून फोन आला. योग असा कि सहसा अनोळखी नंबर वरून येणारे फोन टाळणारी मी तो फोन उचलला पण.. आणि समोरून कानावर पडलेले शब्द ऐकून क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं.

क्षणभर बिलिंग काउंटर वर आपण आहोत याचा विसर पण पडला. आज न उद्या हि बातमी कानावर येणार याची कल्पना काही दिवसांपूर्वीच आली होती पण मन वेड असतं ना..!! परत फोन करते असं सांगून फोन ठेवला. घराकडे पाय वळले आणि डोळ्यासमोर वर्षभराच्या आठवणी चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे डोळ्यासमोरून गेल्या.

बेताचीच उंची, गहूवर्णी, कुरळे केस, डोळ्यात काजळ आणि चुणचुणीत अशी अगदी कॉलेजमध्ये जाणारी मुलगीच वाटावी अशी मानसी आमच्या ऑफिस मध्ये अकाउंट विभागामध्ये रुजू झाली. माझा आणि ह्या विभागाचा फार कमी संबंध किंवा आलाच तरी महिन्यातून एखाद दोन वेळाच.. !! पण म्हणतात ना माणसं भेटणं, त्यांचा सहवास आणि त्यांच्या आठवणी हा पण एक योगायोगच असतो. मानसीच्या बाबतीत पण तसंच झालं.
नवीन असल्याने फारशी न बोलणारी मानसी हि आमच्या जेवणाचा एक ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये येऊ लागली आणि कधी आमच्यातील एक झाली हे समजल नाही. बरेचदा काम पूर्ण करण्याच्या गडबडीत जेवणाची वेळ कधी तिची, तर कधी माझी चुकायची पण एकही दिवस असा  गेला नाही कि तुम्ही जेवलात का? किंवा मी बाहेर जात आहे तुमच्यासाठी काही खायला आणू का? असं मला तिने विचारलं नाही अस कधीच झाल नाही.

जेवणाच्या सुट्टीत आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या मग त्या फॅशन,चित्रपट, पाककृती, असो किंवा आमच्या मुलांच्या आवडी निवडी किंवा त्यांचे किस्से... कधी कधी मुलाचं आजारपण असलं कि घरगुती विषय देखील व्हायचे. मानसीच्या घरची मला फार माहिती नव्हती पण जेंव्हा केंव्हा ती बोलायची तेव्हा वाटायचं कि तिला बरंच काही सांगायचं आहे. आणि माझा हा अंदाज खरं पण ठरला कारण एक दोन वेळेला ती माझ्याजवळ येऊन तिला काही सांगायचं आहे, बोलायचं आहे असं तिनं व्यक्त  पण केलं, तेव्हा आणि त्यानंतर मी तिला तुला काय सांगायचं आहे हे बोल म्हटलं पण नंतर बोलू असं म्हणायची आणि जे सांगायचं आहे ते राहून गेलं आणि तेही कायमचच..!!

मानसीला कोणत्याही प्रकारची वेशभूषा छानच दिसायची.. पार्टी वेअर, वेस्टर्न ड्रेस, साडी, स्कर्ट्स देखील.. तिला जेंव्हा केंव्हा सांगायचे कि तुला हा ड्रेस किंवा हा लूक छान दिसतोय तेव्हा म्हणायची कि मॅडम तुम्हाला देखील छान दिसेल तुम्ही पण एकदा असा ड्रेस घालूनच बघा.. मला आठवतंय मी ऑफिसच्या दुसऱ्या इमारतीत शिफ्ट झाले तेव्हा तिला वाईट वाटलं होतं कारण बोलणं कमी होणार आणि खाण्याच्या फर्माईश यथेच्छ पुरवता येणार नव्हत्या. पण फार काळ आम्ही वेगळ्या राहिलो नाही पुढील काही महिन्यातच ती आम्ही बसायचो त्याच इमारतीत शिफ्ट झाली.

माझं ऑफिसमधून राजीनामा देऊन बाहेर पडणं हे तिला माहित नव्हतं. त्यामुळे ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तिथून बाहेर पडल्यावर तिचा मला फोन येणार हे अपेक्षित होत.. पण मी राजीनामा का दिला ह्यावर चर्चा होऊ नये म्हणून मी कोणत्याही सहकाऱ्यांचे फोन घेऊ नयेत अस मला सांगण्यात आल होत. आणि तसंच झालं.. तिचा फोन आला, बेल वाजत राहिली.. मी फक्त पाहत राहिले अन् फोन घेतला नाही.. त्यानंतर काही दिवसांनी वाटलं कि फोन करावा अन बोलावं पण परत चर्चेला कारण नको म्हणून फोन केला नाही.

आता अशी परिस्थिती आहे कि एक वेळ फोन वाजेल.. फोन उचाललादेखील जाईल पण पलिकडेच काय मानसीचा आवाज  कुठेच नसेल.. कारण ती कायमचीच निघून गेली एकटीच तिच्याच प्रश्नाची उत्तरे शोधत किंवा अनुत्तरीत प्रश्नांसहित.. आणि माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह ठेवून कि मॅडम माझा फोन तुम्ही त्या दिवशी का उचलला नाही?

ह्या एका प्रश्नाने मी स्वतः खूप अजूनही बेचैन होते आणि म्हणूनच सांगते कायम मनाचं ऐका कारण माणसं एक वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला चार गोष्टी करायला सांगतील पण त्यावर तुमच मन हे तुम्हाला कायम योग्यच सांगेल.. माझ्या मनाने मलाही कौल तेव्हा हा तिचा फोन उचल असाच दिला होता पण..

आणि आता ह्यावर बोलून काहीच फायदा नसला तरी व्यक्त होऊन तिची माफी मागावी असं निश्चित वाटलं आणि म्हणून हि माझी चार वाक्य..

मानसी तुझी आठवण हि कायम तुझ्या बडबडीइतकीच येत राहील तुझ्या अनुत्तरीत प्रश्नासहित.. !!

..