Monday 14 August 2017

निमित्त बुकगंगाच्या वाढदिवसाचे..

गर्दीबरोबर सर्वच जण चालतात आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचतात. पण गर्दीपासून दूर जाऊन स्वतःची वेगळी वाट शोधून आपल्या इच्छित स्थळी जाणारे आणि स्वतःची अशी वेगळी प्रतिमा तयार करणारे फार थोडेच म्हणावे लागतील.. असं लिहायचं कारण असं कि आज आहे बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळाचा सातवा वाढदिवस..!!

बुकगंगा डॉट कॉम चे संस्थापक मंदार जोगळेकर हे अमेरिकेमध्ये फिलाडेल्फिया येथे अत्यंत चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत असतानादेखील निव्वळ साहित्याची आणि वाचनाची आवड यामुळे आपल्या साहित्याचा प्रसार जगभरात व्हावा आणि सर्व प्रकारची, प्रकाशनाची पुस्तके हि एका क्लिक वर किंवा फोनवर ऑर्डर देऊन अगदी घरपोच मिळावी हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून १५ ऑगस्ट २०१० रोजी बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळाची सुरुवात केली.

मला आठवतंय माझा पहिला दिवस जेंव्हा मी बुकगंगाचं ऑफिस पहायला गेले होते. तेव्हा बुकगंगा परिवार हा अंदाजे २० जणांचाच होता.. पण आता तो अंदाजे १०० जणांचा आहे.. ग्राहकांकडून पुस्तकांची मागणी जशी येईल तशी पुस्तके बाजारातून आणून त्यांना घरपोच पाठविली जायची. पुस्तकांचा स्टॉक असा मोठ्या प्रमाणावर ठेवला जात नव्हता. पण त्यानंतर हळूहळू प्रकाशकांशी संवाद साधून बुकगंगाचे कार्य आणि आवाका हा त्यांना पटवून दिल्यावर प्रकाशकांकडून पुस्तके स्टॉकसाठी मिळायला लागली. पुस्तके स्टॉकला असल्यामुळे अर्थात ऑर्डर पटापट ग्राहकांसाठी पाठवता येऊ लागल्या. त्याचबरोबरीने जी पुस्तके आता प्रकाशित होत नाहीत किवा देशाबाहेरील वाचकांना ती एका क्लिकवर विकत घेऊन पुढील दोन मिनिटामध्ये वाचता यावीत म्हणून “ई-बुक” ह्या संकल्पनेला सुरुवात केली. “ई-बुक”चे वाढते काम पाहता “ई-बुक” तयार करण्यासाठी एक वेगळी टीम हि रत्नागिरी जिल्ह्यामधील साखरपा सारख्या छोट्या खेड्यामध्ये काम करू लागली. तेथील ऑफिस सुरु करण्यामागील हेतू हा निव्वळ सामाजिक बांधिलकी हा जोगळेकरांचा होता. या टीमला “ई-बुक” तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याहून खास टीम पाठवण्यात आली होती. मुलींनी स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे हा उदात्त हेतू चांगलाच सफल झाला हे आता “ई- बुक” ची संख्या १५००० पेक्षा जास्त संकेतस्थळावर आहे यातूनच दिसून येते.

हे सर्व करत असताना ग्राहकांच्या तक्रारी किंवा त्यांचे ऑर्डर संबंधित प्रश्न किंवा जिथे इंटरनेट सुविधा नाही पण ज्यांना पुस्तकांची ऑर्डर नोंदवायची असेल अशा गोष्टींची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आणि त्याची पूर्तता हि रत्नागिरी येथे कॉल सेंटर ( ग्राहक सेवा केंद्र ) सुरु करून झाली. तिथे २० जणांची टीम कार्यरत आहे.

त्यानंतर १ मार्च २०१५ रोजी पुण्यातील नावाजलेले इंटरनॅशनल बुक सर्विस ह्या दुकानाचे पुनरुजीवन करून “बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्विस” या नावाने सुरुवात केली. बुकगंगासाठी हा खूप महत्वाचा टप्पा ठरला कारण ह्या वास्तूला स्वतःचा असा इतिहास आहेच कारण या वास्तूला अनेक साहित्यिकांचे पाय तर लागलेच पण आंबेडकर, नेहेरू यांसारखे नेते त्यांना हव्या त्या पुस्तकांची मागणी तेथूनच करत हि खूप मानाची गोष्ट.. त्यामुळे हे वलय तसेच टिकून ठेवणे म्हणजे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. पण त्यात देखील यश आले ते सरांचे योग्य मार्गदर्शन आणि सर्व टीमने घेतलेल्या कष्टामुळेच..!!

त्यानंतर स्वतःच पुस्तके प्रकाशित आपण का करू नये हा मनात विचार येऊन “बुकगंगा पब्लिकेशन्स”ला  सुरुवात झाली. आणि “बी positive” हे पहिले पुस्तक पिंपरी चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले. आणि आजपर्यंत “बुकगंगा पब्लिकेशन्स”तर्फे १८ पुस्तके मान्यवर लेखकांची प्रकाशित करण्यात आली.

आतापर्यंत केल त्याहून जास्त आणि वेगळ करायचं हे कायमच जोगळेकर म्हणायचे आणि म्हणून मागील वर्षापासून “ऑडिओ बुक” या संकल्पनेला सुरुवात झाली ती हि ग्राहकांना मोफत दिवाळी अंक उपलब्ध करून देऊन..!! आत्तापर्यंत ८० “ऑडिओ बुक” संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 गेल्या ७ वर्षातील बुकगंगाचा हा प्रवास हा नक्कीच उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगा आहे. प्रत्यक्ष आता तिथे नसले तरी ३ खोल्यांच्या छोट्या ऑफिस पासून ते पुण्यातच अजून एक ऑफिस, साखरपा आणि रत्नागिरी अशा दोन शाखा, आणि “बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्विस” हे पुस्तकांचे दालन अशा प्रवासाची मी साक्षीदार होते याचा कायम अभिमान राहील. अर्थात हे सांगत असताना माझे सर्व सहकारी आणि मला ज्यांनी प्रशिक्षण दिले असे आमचे संस्थापक मंदार जोगळेकर आणि विवेक चितळे सर यांचा उल्लेख हा महत्वाचा ठरतो कारण यांच्याशिवाय मी करत असलेल्या कामांमधील महत्वाचे टप्पे पार करणे कठीणच झाले असते.

तर असा हा थोडक्यात घेतलेला बुकगंगा.कॉमचा वेध.. आणि तो हि बुकगंगा.कॉम च्या वाढदिवसानिमित्त..!! बुकगंगा.कॉम ची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि मंदार जोगळेकर यांनी लावलेल्या ह्या छोट्या रोपट्याचा मोठा वटवृक्ष होवो..!! आणि बहार येवो याच शुभकामना..!!

श्रावणी..