Thursday 5 April 2018

तळमजला..

बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते खरं आहे. आता जेंव्हा समवयीन बालपणीचे मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा जुन्या आठवणींना अगदी सहजपणे उजाळा दिला जातोच.. अशीच एक आठवण – आठवण तळमजल्याची..!!
पूर्वी मोठमोठाले कॉम्प्लेक्सची संस्कृती नव्हती तरी त्यामानाने आम्ही जिथे राहायचो ती सोसायटी हि मोठीच म्हणायची. म्हणजे साधारण २५ बिऱ्हाडे होती. अंदाजे इयत्ता चौथी पर्यंत मी माझ्या आजीकडेच राहायला आणि सांभाळायला होते त्यामुळे सोसायटीमधील सर्वांशीच खूप संपर्क नसायचा. हा मात्र ठराविक घर अशी आहेत जिथे माझा मुक्काम नक्की असायचा. थोडक्यात सांगायचं तर पडिक असायचे मी.. ती घरं म्हणजे देसाई आणि टिकेकर काका काकू यांचे.. जणू काही तीदेखील माझीच घर आहेत अशा थाटात माझा वावर असायचा. आणि तो वावर इतका सहज असायचा कि त्यांच्याकडील येणारे पाहुणे पण विचारायचे कि तुमची मुलगी का?
गणपतीमध्ये देसाई काकूंकडे मला राहायचं असायच कारण त्यांच पाहुण्यांनी भरलेलं घर, गप्पा, एकत्र मिष्टान्न जेवण आणि त्यांचे पुतणी पुताण्यांबरोबर खेळ आणि गप्पा असा बेत मला कायम खुणावायचा. त्या काळात आई कटाक्षाने पढवून पाठवायची मला कि “आरती झाली, प्रसाद काकुनी दिला कि तडक घरी यायचं. जेवायला थांबायचं नाही.” पण नाही !! तसं कधीच व्हायचं नाही. काकूंनी आणि काकांनी सांगितलं कि त्यांच सांगण लगेच ऐकायचे आणि तडक शेजारी टिकेकर काकुच्या घरात जाऊन खिडकीतून आईला हाक मारायचे व ताट दाखवून ओरडायचे “आई आजच्या दिवसच जेवते ना !” हा संवाद अर्थात तळमजला आणि पहिला मजला असा चालायचा आणि पूर्ण सोसायटीला समजायचं कि मी आज देसाई काकूंकडे जेवणार आणि दुसरं म्हणजे “आजच्याच दिवस” हे गणपतीचे सातही दिवस असायचं कारण काकुकडे गौरी गणपती असायचे.

हि आठवण माझ्या एकटीची माझ्या पुरतीच फक्त माझीच..!! पण मग जसजसे मोठे होत गेलो सोसायटीमधील सर्व मित्रमंडळी चांगली परिचयाची झाली. हळूहळू शाळेतून घरी आल्यावर पोटात एकदाच काही ढकलून कधी खाली खेळायला जाऊ असं व्हायला लागलं..!! कारण रोज एक नवीन खेळ खेळायचं आकर्षण.. !! कारण प्रत्येक खेळाचा प्रमुख वेगळा असायचा..!! कधी बॅडमिंटन, आंधळी कोशिंबीर, चीनची भिंत, लगोरी, डबाइसपैस, खांब खांब खांबोळी, लंगडी, टीपी टीपी टीप टॉप, हे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. हे सर्व खेळत असताना आमच्या खेळण्याच्या वस्तू, रुमाल, चपला, रॅकेट्स, या वस्तू नीट ठेवण्यासाठी कायम आम्ही तळमजल्यावर राहणाऱ्या सर्वांनाच आणि मुख्यत्वे टिकेकर आणि देसाई काका काकूंना खूप त्रास द्यायचो. उन्हाळ्याच्या दिवसात तर इतके वेळा आम्ही पाणी पिण्यासाठी जायचो आणि ते पण अगदी आनंदाने गार पाणी कधी माठातील किंवा फ्रीजमधील प्यायला द्यायचे. हे करत असताना कधीच त्यांनी कंटाळा केला नाही. ऑफिसमधून दमून आलेले असले तरी कधी चिडले नाही. कधी कधी दोन्ही काकू आम्हाला खेळून दमला असाल म्हणून गोळी, चॉकलेट, बिस्कीट किंवा काही खाऊ हातावर ठेवायच्या. कधी कधी वेळेप्रसंगी ओरडायच्या पण ते देखील आमच्या चांगल्यासाठीच.. कारण खेळायला जाण्याची घाई असल्यामुळे उभ्याने पाणी पिऊन पाळायच असायचं.. मग काकूच वाक्य कानावर यायचं “अरे/ अग हळू आणि बसून पाणी प्या..!! नाहीतर पोटात दुखेल.” त्यावर “काही नाही दुखत..” असं म्हणून पळून जायचो. हे शाळा असो किंवा सुट्ट्या असो कायमच असायचं.
सुट्ट्यांमध्ये तर हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळचा उपक्रम फक्त सुट्ट्यांमध्ये सकाळसाठी तळमजल्याची घर बदलायची... मग आम्ही लेले, सुबंध, कुलकर्णी परांजपे, सोपारकर यांना त्रास द्यायचो. या सर्वांनीच आमचे हे त्रास प्रेमाने सहन केलेच पण वेळेप्रसंगी कोणाला लाही लागलं, खुपलं तर औषध, मलमपट्टी देखील केली. यातूनच आमचं या सर्वांशीच एक वेगळच नात निर्माण झालं.

जसजसे मोठे झालो कॉलेज सुरु झाले मग हे सर्व खेळ बंद झाले पण कॉलेजमधून येता जाता काका काकुंना हॅलो म्हणून पुढे जायचो. मग खेळण्याचे साहित्य, रुमाल, चप्पल या वस्तूंची जागा घराच्या किल्ल्या/ चावी, वेळप्रसंगी काही निरोप यांनी घेतली. कॉलेजमधून किल्ली घ्यायला गेले कि पाणी प्यायला थांबायचे तेंव्हा घरचे कॉलेजच्या आणि इतर गप्पा व्हायच्या त्यात अर्धा तास कसा जायचा समजायचं नाही.. अशातच कधी वरच्या मजल्यावरची गोखले काकू छान उन्ह खात भाजी घेऊन येताना दिसायची, कोणी शाळेसाठी निघालेलं असायचं आणि अशातच परत तिथेच गप्पांचा अड्डा जमायचा.

या सर्वांना दिवाळीत सर्वात जास्त त्रास आम्ही दिला असेल. कारण सुट्टी लागली कि किल्ला करणे यासाठी पाण्याच्या बादलीपासून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतील त्या आम्ही मागायचो. आणि सर्वात कहर म्हणजे दिवाळीची पहाट.. पहिला अटमबॉम्ब कोण लावणार?? आम्ही म्हणायचो आम्ही लावणार पण तसं व्हायचाच नाही कारण इतक्या पहाटे उठायचोच नाही आणि बहुदा तो ‘सुशील कुलकर्णी’ किंवा ‘राहुल कुलकर्णी’च पहाटे ५ ला उठून लावायचे आणि मग आमची सुरुवात..!! जणू काही तो नियमच असावा सर्व प्रांजालीकारांना उठवण्याचा..!! तसच आमच्या मैत्रिणी आल्या नाही वेळेवर किंवा बाहेर जाण्यासाठी हाक मारायची झाली तर तीदेखील काकुच्या इथे उभी राहूनच जोरात हाक मारायची कारण तिथून हाक मारली कि आमचा आवाज घुमायचा.. त्याची आंम्हाला मजा वाटायची पण हे करताना, फटाके उडविताना त्यांना किती त्रास झाला असेल हा विचार तेंव्हा मनात कधीच आला नाही.. पण आता नक्कीच येतो. कारण कॉलेज संपल्यावर कोणाचे पुढचे शिक्षण, कोणाची नोकरी आणि मग लग्न होऊन एक एक जण मुख्यत्वे मुली सासरी गेल्या आणि काही दुसऱ्या नवीन मोठ्या जागेत राहायला गेले. माझंही फारस जाण आता होत नाही पण जेंव्हा जाते तेव्हा येता जाता खिडकीत टिकेकर काका काकू आहेत का हे पाहिलं जातं. असतील तर कधी खिडकीत उभे राहूनच गप्पा आणि चौकशी केली जाते. पण आता पूर्वीसारखा आमचा चहाचा अड्डा कधीतरीच जमतो.

हे सगळं एकीकडे घडत गेलं असलं तरी तळमजल्यावरची घर तशीच आहेत. त्यातील माणस काही आहेत, काही आता आपल्यात नाहीत, तर काही जागा सोडून गेले आणि तिथे नवीन बिऱ्हाडकरू आले. वेळेनुरूप संदर्भ बदलले. आता जेवढे तळमजल्यावर आमचे हक्काचे काका काकू आहेत त्यांचेही हात आणि डोळे थकले आहेत. हातात काठी, कंबरेला पट्टा आला आहे. हे सर्व जरी असलं तरी उत्साह मला लाजवेल असा आहे. कारण अजूनही “ये ग चहा प्यायला.. गप्पा मारायला असं म्हटलं जातच.!!” जे अजून तिथे आहेत त्यांना आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी नक्कीच आठवत असतील.. आत्ता हे लिहित असतानाच मी परत एकदा लहान झाले. मन भावूक झालं. यासाठी कि जगलेले हे क्षण परत येणार नाहीतच पण असे क्षण, हे खेळ, असा छान शेजार आपल्या मुलांना नक्कीच लाभणार नाही. आपण जरी हे क्षण जगलेले असलो आणि आपण जरी फेसबुक, व्होट्सअप, मोबाईल अशा अनेक माध्यमांमधून जोडले गेलो असलो तरी संवाद साधण्यासाठी वेळ सर्वांकडे आहेच असं नाही. आपली सोसायटी “प्रांजली” लवकरच कात टाकेल असे वारे वाहू लागले आहेत. म्हणजे तिथे आता मोठा १० - ११ मजल्याचा कॉम्प्लेक्स तयार होईल. जेंव्हा कोणतीही माध्यमे नसताना आपण एकमेकांना इतके जोडले गेलो होतो तेच आपण इतकी माध्यमे असताना देखील मनाने दूरच आहोत असं वाटत आणि हा टोलेजंग कॉम्प्लेक्स झाल्यावर आपल्यातील संवाद आणि आपल्याशी संवाद साधणारा तळमजला पण आपल्या प्रमाणेच बंदिस्त होईल कि काय असं वाटतय.
फेसबुकवरून फिलिंग हॅपी स्टेट्स टाकणारे किंवा चेक इन टू आणि लाईक करण्याच्या या जगात राहणारे आपण आपलं बालपण, तळमजला, तिथे राहणारी माणस यांना नुसत्या आठवणीतच नाही तर संवादातून जपूया.. फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी.. आपल्या आई बाबांसाठी.. आपल्या लाडक्या शेजार्यांसाठी.. !!
तुम्हाला काय वाटत.??

स्वप्ना..