Monday 27 May 2019

आई, कॉफी आणि मी... 🙂
बघता बघता उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. तसं म्हटलं तर ठाण्याला येणं हे अधून मधून होतंच असत. येण्याची वर्दी आधीच दिली असली कि भेटीगाठीचे कार्यक्रम आणि कामांची यादी पण तशी तयारच असते. पण यावेळी जरा बदल केला.
शनिवारी निघून रविवारी पुण्यात परत जाणारी मी रविवारी उशिरा इथे आले. पुण्याहून निघतानाच सगळं ठरलेल असतं पण यावेळी नक्की असं काहीच ठरवलं नव्हतं. नक्की इतकच होत कि गौरांगला घेऊन परत पुण्यात यायच.
एरवी कॉफीचे नेहेमीच्या अड्ड्यावर भेटण्याचे किंवा एकत्र आपल्या मित्रमैत्रिणी किंवा घरच्यांसोबत जेवायला बाहेर जायचे कार्यक्रम घडवून आणण्यास उत्सुक असणाऱ्या मला या खेपेस अजिबात उत्साह नव्हता. त्यामुळे आजचा दिवस आई बाबांसोबत आणि माझं फेसबुकच काम करण्यात घालवला.
संध्याकाळी आईसोबत एक चक्कर मारायला जायच ठरवून मी बाहेर पडले. ती आधीच तिच्या संस्कार भारतीच्या कामासाठी बाहेर गेली होती त्यामुळे तिला गोखले रोडवर एका ठिकाणी भेटायचं ठरलं.
सोमवार असल्याने दुकाने शक्यतो बंद आणि त्या दिवशी बंद दुकानांच्या बाहेर कपडे, पर्सेस, टीशर्ट्स वगैरेची दुकानं थाटलेली असतात त्यामुळे खरेदी नाही केली तरी चालत एक छान फेरी मारून होईल हा विचार मनात धरून मी आणि आईने चालायला सुरुवात केली. गोखले रोड म्हणजे पायाखालचा रस्ता त्यामुळे कुठे पोहोचल्यावर कोणत्या पदार्थांचे वास येणार हे माहित होतं. उन्हाळ्यामुळे माझी आणि आईची स्थिती सारखीच होती. त्यातच तिला रात्री जेवायला काय करू याची भ्रांत होतीच. पण तिला कंटाळा देखील आला होता. तिने काहीतरी चटपटीत खायचं का? विचारल्यावर मी चालतंय कि म्हटलं 🙂 पण मग त खायचं तर काय खायचं यावर चर्चा. तिने गोखले उपहार गृह, अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र अशी नवे घेतल्यावर मी अत्यंत आंबट चेहेरा करून त्यापेक्षा घरीच जेवू म्हटल. शेवटी हो नाही करत तिच्याच आवडीच्या हॉटेल मध्ये "सुरज" राम मारुती रोडला आहे तिथे जायचं ठरलं.
एसी मध्ये बसून मनसोक्त तिने शेजवान स्प्रिंग डोसा आणि मी चीज ओनियन उत्तपा यावर ताव मारला. खात असताना ती त्या हॉटेल मध्ये अनेक वेळा आल्यामुळे वेगवेगळ्या आठवणी सांगत होती.मध्येच तिचा फोटो, कॉफीच्या कप्सचा फोटो क्लिक केला. उठसुठ फोटो काढत असते हे तिला माहित असल्याने तिने फारशी फोटो का क्लिक करते हि चौकशी न करता फोटो काढून दिला. तिला कुठे माहित होतं कि मी तिचा फोटो का क्लिक करतेय ते...!!! गप्पांमध्ये असंही तिनं सांगितलं कि सुरजमध्ये कॉफी छान मिळते आणि डोसा/उत्तप्पा खाल्यावर कॉफी नाही म्हणजे नाइन्साफच...!!! म्हणून कॉफी ऑर्डर केली.घरी बाबांसाठी आणि गौरांग साठी त्यांच्या आवडीचे पार्सल घेऊन मस्त गप्पा मारत, परत रमत गमत चालत घरी पोहोचलो.
घरी येताना मनात हाच विचार आला कि इतके वेळा मी येते पण आपण दोघी जाऊया बाहेर कॉफी प्यायला किंवा खायला हे आईने कधीच बोलून दाखवले नाही कायम पूर्ण कुटुंब एकत्र जाऊ असं म्हणायची. पण आज काहीच न ठरवता जुळून आलेला योग खूप आनंद देऊन गेला.आणि म्हणूनच असं वाटत कि आपल्यासारख CCD, Strabucks,Barista यांसारख्या ठिकाणी कॉफीला तुम्ही का जाता हा प्रश्न आणि त्यावर का जातो हे तिला समजावून सांगण्यापेक्षा एखादवेळी तिच्या आवडीच्या ठिकाणी तिच्यासोबत जाऊन काही तास घालवला तर काय हरकत आहे? कारण जशी आज ती आणि मी एकेमेकीसमोर बसून मस्त गप्पा मारत खात पीत वेळ घालवला. तशी वेळ काही वर्षानंतर माझी पण येईलच कि...!!! फक्त समोरची व्यक्ती बदलली असेल... आणि म्हणतात ना कि कोणाचा वेळ हा पैशाने विकत घेता येत नाही त्यामुळे आपण एखाद्याला दिलेला वेळ मग तो समक्ष भेटीत असो किंवा फोनवर बोलून असो यासारखी सुरेख भेट नाही..!!
©️स्वप्ना.
Add caption