Monday 29 July 2019

Smile Please!!!

रिपोर्ट्सच्या फाइलकडे पाहून हि माझी ओळख नसणारे तर माझं काम माझी ओळख असणार आहे... किंवा जोपर्यंत लक्षात आहे तोपर्यंत विचार... असे संवाद आणि त्याबरोबर तितक्याच सहजतने आणि ताकदीने आपली भूमिका वठविताना मोठ्या पडद्यावर दिसणारी नंदिनी, नंदू म्हणजेच मुक्ता बर्व परत एकदा मनात घर करून गेली.

गोष्ट एक नामांकित फोटोग्राफर, जिला आयुष्यात आपल्याला काय हवे आहे, काय करायचं आहे हे खुप स्पष्ट आहे. धडाडीची, महत्वाकांक्षी आणि स्वतःच्या क्षेत्रात नावलौकिक असलेली नंदिनी हिला मोठ्या पडद्यावर पाहताना हि तर आपल्यातीलच एक आहे आणि असं काही कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं अगदी माझ्याही!!! असं नक्कीच मनात येऊन जातं.

दैनंदिन जीवनातील गोष्टी अगदी सहज करणारी नंदिनी काही साध्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी विसरते. हि गोष्ट ती तिच्या कॉलेजपासून ओळखत असणाऱ्या डॉक्टर मैत्रीणीला सांगते. तिच्या सांगण्यावरून नंदिनीच्या वैद्यकीय चाचण्या होतात आणि त्यातून जे समजतं तेव्हापासून ते चित्रपट संपेपर्यंत पडद्यावर दिसणारी नंदिनी हि आपलीच कोणीतरी एक असावी असं वाटत.

ज्यावर काही औषध नाही असा आजार आपल्याला झाला आहे हे वडिलांपासून लपवणारी आणि नंतर
ऑफिसचे कागद शोधताना रिपोर्ट्सची फाईल वडिलांना मिळाल्यावर त्यांना घट्ट बिलगणारी नंदिनी...
आपल्याला डिमेंशिया कसा काय होऊ शकतो आणि तो झाला आहे हे आधी नाकरणारी पण असेल झाला तरी मी माझं आयुष्य तितक्याच आनंदनं जगणार असं आपल्यापासून विभक्त झालेल्या नवऱ्याला सांगणारी नंदिनी...
कालांतराने हा आजार जास्तच बळावल्यानंतर वयात येणाऱ्या आपल्या मुलीला एकच प्रश्न अनेकदा विचारणारी आणि त्यामुळे चिडलेल्या आपल्या मुलीशी तितकीच शांतपणे बोलणारी नंदिनी...
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत हरवलेली, आवाज, गोंगाट सहन न होणारी, रस्ता विसरलेली नंदिनी, जिला विराज नावाचा युवक जो त्यांच्याकडेच काही दिवसांसाठी राहायला आलेल्या या पाहुण्याचे एका क्षणी आभार मानणारी आणि दुसऱ्याच क्षणी हा कोण इथे कशाला आला असं म्हणणारी नंदिनी ...
या आणि अशा अनेक दृश्यांमधून आपल्या आजारविषयी राग, तर कधी त्यामुळे आलेली निराशा, हतबलता... तसचं मूळ महत्वाकांक्षी स्वभाव असणारी आणि धडाडीने तितक्याच जोमाने स्वतःला यातून बाहेर काढण्यासाठी झगडणारी नंदिनी हि मुक्ताने अत्यंत ताकदीने साकराली आहे.

बायकोपासून विभक्त झालेला, आणि आपली मुलगी नूपुर च्या वडिलांची भूमिका साकरणारा प्रसाद ओक याने काही प्रसंगातुन डोकवणारा पुरुषी अहंकार, पण विभक्त झाला असला तरी नंदिनी विषयी काळजी करणारा आणि घेणारा नवरा, तसच मुलीवर कधी प्रेम तर वेळप्रसंगी तिला दटावणारा एक बाप खुप छान रंगविला आहे.

आपली आई ही आई नसून शत्रुच आहे. जीने आपल्यापेक्षा आपल्या करियर ला महत्व देऊन आपल्याकडे दुर्लक्ष केलं ही मानसिकता घेऊन वयात आलेली नूपुर, तिच्या सहवासासाठी आतुर असलेली नंदिनी आणि त्या दोघींमधील काळानुरूप वाढत चाललेली दरी हि अनेक प्रसंगातुन दिसून येते. नूपुर ची भूमिका साकरलेली वेदश्री महाजन हिने वयात येणाऱ्या मुलीचे मूड, राग, आईवडिलांकडून असणाऱ्या अपेक्षा, त्या पूर्ण होण्यासाठी केलेला हट्ट, प्रसंगी आईचा किंवा बाबांचा रागराग आणि आईचा न बरा होणारा आजार समजल्यावर हीच काय ती वेळ आहे तिला समजून घेण्याची असं सांगणाऱ्या विराजच्या बोलण्यावर आधी फारसा विचार न करणारी आणि नंतर परिस्थिति समजून आईची काळजी आणि तिला परत उभ करण्यासाठी विराज ला साथ देणारी नूपुर आवडली.

सतीश आळेकर यांनी नंदिनीच्या वडिलांची भूमिका मस्त निभावलीच पण बरोबरीने एक आजोबा, सासरा, मित्र अशा छटा छान रंगवल्या.

मूळचा नागपुरकर पण कामानिमित्त प्रथमच मुंबईत आलेला आणि कोणीच ओळखीचे मुंबईत नसल्याने काही दिवस पाहुणा म्हणून नंदिनीच्या वडिलांच्या घरी  राहायला आलेला विराज म्हणजेच ललित प्रभाकर. लहानपणीच आईवडिलांची छत्रछाया गमावल्यामुळे त्यांच्या प्रेमापासून वंचित राहिलेला विराज हा नंदिनीसाठी देवदूतच ठरतो. नंदिनीच्या
आजाराविषयी समजल्यावर, फारशा आशा न उरलेल्या आणि प्रत्त्येक दिवस एक नविन आव्हान म्हणून पेलणाऱ्या नंदिनीची, स्वतःच वेगळेपण जपणाऱ्या नंदिनीशी तो नव्याने ओळख करून देतो. हे सर्व करत असताना त्याने निखळ मैत्री असणारी मित्राची भूमिका इतकी छान केली आहे की कोणालाही अगदी सहज वाटेल की आपला असा एखादा मित्र नक्कीच असावा.

अदिती गोवित्रीकर ने डॉक्टर मैत्रीणिची भूमिका हि चांगली निभावली आहे. मूलतः मॉडेल म्हणून नावरूपास आलेली अदितीचा अभिनय असलेला मी पहिलेला पहिलाच चित्रपट, त्यामुळे अभिनय चांगला बरा हे मी ठरवणं योग्य नाही.

विक्रम फडणीस हा उत्तम फॅशन डिझायनर तर आहेच पण त्याने स्माइल प्लीज या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाद्वारे  अगदी सामन्यांपर्यंत पोहोचण्याचा खुप छान प्रयत्न केला आहे. एक मात्र निश्चित की चित्रपटात डिमेंशिया या आजाराचा धागा घेऊन हा आजार झाल्यावर रुग्णाची होणारी अवस्था आणि त्यामुळे त्याच्या आप्तेष्टांचे रुग्णासोबत जग बदलते आणि अशावेळी त्याच्याभोवती त्याला समजून घेणारी माणसं मग ते नातेवाईक किंवा एखादा छानसा मित्र किंवा मैत्रिण असे सर्व असेल तर रुग्णाच जगण थोडं सुकर होऊन आयुष्य जगण्याची उर्मी त्याच्यात नक्कीच निर्माण होऊ शकते. त्याच बरोबरीने हा आजार बरा होणारा नाही हे जितकं सत्य आहे तितकच या आजाराविषयी जास्तीत जास्त जाणून घेऊन, त्या रुग्णाविषयी कोणतेही गैरसमज न करता किंवा ते न पसरवता योग्य तो मदतीचा हात दिला तर त्या माणसाचं उर्वरित आयुष्य थोडं तरी सुसह्य करू शकतो असा संदेश छान पोहोचवला आहे.

थोडक्यात काय चेहऱ्यावर एक छोटीशी हास्याची रेष समोरच्याच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणु शकते हे निश्चित...!!! आणि म्हणूनच
Smile Please!!! 😊

©️स्वप्ना शेंडे भिडे.
https://muktashravansari.blogspot.com