Saturday 2 December 2017

सावली

सावली

आयुष्यात आपल्याला  बरीच  अनोळखी  माणसे  भेटतात,
कालांतराने  तेच  अनोळखी चेहेरे आपल्या  आयुष्याचा एक भाग होतात.
वेळेनुरूप काही साथ सोडून जातात, तर काही आपले आयुष्यच होतात..
पण, त्याहूनही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला  साथ देते...
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत....
ती म्हणजे.....
'सावली'

ऋतू बदलतात तसे आपले दिवस बदलतात,
त्यानुरूप माणसे बदलतात, त्यांचे आपल्याशी वागणे बदलते
इतकेच नव्हे तर आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी  ह्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
तेंव्हाही आपल्याला साथ देते
ती म्हणजे...
"सावली"


ग्लास पाण्याने अर्धा भरलेला असो वा रिकामा,
मिष्टान्न भोजनाचा योग असो वा असो खावयास मुठभर चुरमुरे
घालावयास  मिळो रेशमी वस्त्रे वा असो  "पुरानी जीन्स "
तेंव्हाही आपल्याला साथ देते
ती म्हणजे...
"सावली"


सर्वांबरोबर असूनही एकटीच असते
ती म्हणजे...

"सावली"

Monday 14 August 2017

निमित्त बुकगंगाच्या वाढदिवसाचे..

गर्दीबरोबर सर्वच जण चालतात आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचतात. पण गर्दीपासून दूर जाऊन स्वतःची वेगळी वाट शोधून आपल्या इच्छित स्थळी जाणारे आणि स्वतःची अशी वेगळी प्रतिमा तयार करणारे फार थोडेच म्हणावे लागतील.. असं लिहायचं कारण असं कि आज आहे बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळाचा सातवा वाढदिवस..!!

बुकगंगा डॉट कॉम चे संस्थापक मंदार जोगळेकर हे अमेरिकेमध्ये फिलाडेल्फिया येथे अत्यंत चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत असतानादेखील निव्वळ साहित्याची आणि वाचनाची आवड यामुळे आपल्या साहित्याचा प्रसार जगभरात व्हावा आणि सर्व प्रकारची, प्रकाशनाची पुस्तके हि एका क्लिक वर किंवा फोनवर ऑर्डर देऊन अगदी घरपोच मिळावी हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून १५ ऑगस्ट २०१० रोजी बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळाची सुरुवात केली.

मला आठवतंय माझा पहिला दिवस जेंव्हा मी बुकगंगाचं ऑफिस पहायला गेले होते. तेव्हा बुकगंगा परिवार हा अंदाजे २० जणांचाच होता.. पण आता तो अंदाजे १०० जणांचा आहे.. ग्राहकांकडून पुस्तकांची मागणी जशी येईल तशी पुस्तके बाजारातून आणून त्यांना घरपोच पाठविली जायची. पुस्तकांचा स्टॉक असा मोठ्या प्रमाणावर ठेवला जात नव्हता. पण त्यानंतर हळूहळू प्रकाशकांशी संवाद साधून बुकगंगाचे कार्य आणि आवाका हा त्यांना पटवून दिल्यावर प्रकाशकांकडून पुस्तके स्टॉकसाठी मिळायला लागली. पुस्तके स्टॉकला असल्यामुळे अर्थात ऑर्डर पटापट ग्राहकांसाठी पाठवता येऊ लागल्या. त्याचबरोबरीने जी पुस्तके आता प्रकाशित होत नाहीत किवा देशाबाहेरील वाचकांना ती एका क्लिकवर विकत घेऊन पुढील दोन मिनिटामध्ये वाचता यावीत म्हणून “ई-बुक” ह्या संकल्पनेला सुरुवात केली. “ई-बुक”चे वाढते काम पाहता “ई-बुक” तयार करण्यासाठी एक वेगळी टीम हि रत्नागिरी जिल्ह्यामधील साखरपा सारख्या छोट्या खेड्यामध्ये काम करू लागली. तेथील ऑफिस सुरु करण्यामागील हेतू हा निव्वळ सामाजिक बांधिलकी हा जोगळेकरांचा होता. या टीमला “ई-बुक” तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याहून खास टीम पाठवण्यात आली होती. मुलींनी स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे हा उदात्त हेतू चांगलाच सफल झाला हे आता “ई- बुक” ची संख्या १५००० पेक्षा जास्त संकेतस्थळावर आहे यातूनच दिसून येते.

हे सर्व करत असताना ग्राहकांच्या तक्रारी किंवा त्यांचे ऑर्डर संबंधित प्रश्न किंवा जिथे इंटरनेट सुविधा नाही पण ज्यांना पुस्तकांची ऑर्डर नोंदवायची असेल अशा गोष्टींची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आणि त्याची पूर्तता हि रत्नागिरी येथे कॉल सेंटर ( ग्राहक सेवा केंद्र ) सुरु करून झाली. तिथे २० जणांची टीम कार्यरत आहे.

त्यानंतर १ मार्च २०१५ रोजी पुण्यातील नावाजलेले इंटरनॅशनल बुक सर्विस ह्या दुकानाचे पुनरुजीवन करून “बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्विस” या नावाने सुरुवात केली. बुकगंगासाठी हा खूप महत्वाचा टप्पा ठरला कारण ह्या वास्तूला स्वतःचा असा इतिहास आहेच कारण या वास्तूला अनेक साहित्यिकांचे पाय तर लागलेच पण आंबेडकर, नेहेरू यांसारखे नेते त्यांना हव्या त्या पुस्तकांची मागणी तेथूनच करत हि खूप मानाची गोष्ट.. त्यामुळे हे वलय तसेच टिकून ठेवणे म्हणजे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. पण त्यात देखील यश आले ते सरांचे योग्य मार्गदर्शन आणि सर्व टीमने घेतलेल्या कष्टामुळेच..!!

त्यानंतर स्वतःच पुस्तके प्रकाशित आपण का करू नये हा मनात विचार येऊन “बुकगंगा पब्लिकेशन्स”ला  सुरुवात झाली. आणि “बी positive” हे पहिले पुस्तक पिंपरी चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले. आणि आजपर्यंत “बुकगंगा पब्लिकेशन्स”तर्फे १८ पुस्तके मान्यवर लेखकांची प्रकाशित करण्यात आली.

आतापर्यंत केल त्याहून जास्त आणि वेगळ करायचं हे कायमच जोगळेकर म्हणायचे आणि म्हणून मागील वर्षापासून “ऑडिओ बुक” या संकल्पनेला सुरुवात झाली ती हि ग्राहकांना मोफत दिवाळी अंक उपलब्ध करून देऊन..!! आत्तापर्यंत ८० “ऑडिओ बुक” संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 गेल्या ७ वर्षातील बुकगंगाचा हा प्रवास हा नक्कीच उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगा आहे. प्रत्यक्ष आता तिथे नसले तरी ३ खोल्यांच्या छोट्या ऑफिस पासून ते पुण्यातच अजून एक ऑफिस, साखरपा आणि रत्नागिरी अशा दोन शाखा, आणि “बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्विस” हे पुस्तकांचे दालन अशा प्रवासाची मी साक्षीदार होते याचा कायम अभिमान राहील. अर्थात हे सांगत असताना माझे सर्व सहकारी आणि मला ज्यांनी प्रशिक्षण दिले असे आमचे संस्थापक मंदार जोगळेकर आणि विवेक चितळे सर यांचा उल्लेख हा महत्वाचा ठरतो कारण यांच्याशिवाय मी करत असलेल्या कामांमधील महत्वाचे टप्पे पार करणे कठीणच झाले असते.

तर असा हा थोडक्यात घेतलेला बुकगंगा.कॉमचा वेध.. आणि तो हि बुकगंगा.कॉम च्या वाढदिवसानिमित्त..!! बुकगंगा.कॉम ची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि मंदार जोगळेकर यांनी लावलेल्या ह्या छोट्या रोपट्याचा मोठा वटवृक्ष होवो..!! आणि बहार येवो याच शुभकामना..!!

श्रावणी..





Sunday 7 May 2017

क्षण..

आज तुला जाऊन बरोबर सात दिवस झाले काही लिहावसं वाटलं म्हणून तुझ्यासाठी..

काही वर्षांपूर्वी दोन ओळी सुचलेल्या त्या अशा कि

क्षण असा जो ठेविला आहे मी जपुनी
येईल का योग तो परत जगण्याचा जुळुनी..??

मलाच सुचलेलं वाक्य मलाच आज  हास्यास्पद वाटत आहे पण काल प्रकर्षाने या वाक्याची आठवण आणि त्याबरोबरीने अनेक सुंदर, गमतीशीर क्षणांची आठवण झाली. कारण पण तसचं होतं. दुपारी दुकानात असताना एका अनोळखी नंबर वरून फोन आला. योग असा कि सहसा अनोळखी नंबर वरून येणारे फोन टाळणारी मी तो फोन उचलला पण.. आणि समोरून कानावर पडलेले शब्द ऐकून क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं.

क्षणभर बिलिंग काउंटर वर आपण आहोत याचा विसर पण पडला. आज न उद्या हि बातमी कानावर येणार याची कल्पना काही दिवसांपूर्वीच आली होती पण मन वेड असतं ना..!! परत फोन करते असं सांगून फोन ठेवला. घराकडे पाय वळले आणि डोळ्यासमोर वर्षभराच्या आठवणी चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे डोळ्यासमोरून गेल्या.

बेताचीच उंची, गहूवर्णी, कुरळे केस, डोळ्यात काजळ आणि चुणचुणीत अशी अगदी कॉलेजमध्ये जाणारी मुलगीच वाटावी अशी मानसी आमच्या ऑफिस मध्ये अकाउंट विभागामध्ये रुजू झाली. माझा आणि ह्या विभागाचा फार कमी संबंध किंवा आलाच तरी महिन्यातून एखाद दोन वेळाच.. !! पण म्हणतात ना माणसं भेटणं, त्यांचा सहवास आणि त्यांच्या आठवणी हा पण एक योगायोगच असतो. मानसीच्या बाबतीत पण तसंच झालं.
नवीन असल्याने फारशी न बोलणारी मानसी हि आमच्या जेवणाचा एक ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये येऊ लागली आणि कधी आमच्यातील एक झाली हे समजल नाही. बरेचदा काम पूर्ण करण्याच्या गडबडीत जेवणाची वेळ कधी तिची, तर कधी माझी चुकायची पण एकही दिवस असा  गेला नाही कि तुम्ही जेवलात का? किंवा मी बाहेर जात आहे तुमच्यासाठी काही खायला आणू का? असं मला तिने विचारलं नाही अस कधीच झाल नाही.

जेवणाच्या सुट्टीत आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या मग त्या फॅशन,चित्रपट, पाककृती, असो किंवा आमच्या मुलांच्या आवडी निवडी किंवा त्यांचे किस्से... कधी कधी मुलाचं आजारपण असलं कि घरगुती विषय देखील व्हायचे. मानसीच्या घरची मला फार माहिती नव्हती पण जेंव्हा केंव्हा ती बोलायची तेव्हा वाटायचं कि तिला बरंच काही सांगायचं आहे. आणि माझा हा अंदाज खरं पण ठरला कारण एक दोन वेळेला ती माझ्याजवळ येऊन तिला काही सांगायचं आहे, बोलायचं आहे असं तिनं व्यक्त  पण केलं, तेव्हा आणि त्यानंतर मी तिला तुला काय सांगायचं आहे हे बोल म्हटलं पण नंतर बोलू असं म्हणायची आणि जे सांगायचं आहे ते राहून गेलं आणि तेही कायमचच..!!

मानसीला कोणत्याही प्रकारची वेशभूषा छानच दिसायची.. पार्टी वेअर, वेस्टर्न ड्रेस, साडी, स्कर्ट्स देखील.. तिला जेंव्हा केंव्हा सांगायचे कि तुला हा ड्रेस किंवा हा लूक छान दिसतोय तेव्हा म्हणायची कि मॅडम तुम्हाला देखील छान दिसेल तुम्ही पण एकदा असा ड्रेस घालूनच बघा.. मला आठवतंय मी ऑफिसच्या दुसऱ्या इमारतीत शिफ्ट झाले तेव्हा तिला वाईट वाटलं होतं कारण बोलणं कमी होणार आणि खाण्याच्या फर्माईश यथेच्छ पुरवता येणार नव्हत्या. पण फार काळ आम्ही वेगळ्या राहिलो नाही पुढील काही महिन्यातच ती आम्ही बसायचो त्याच इमारतीत शिफ्ट झाली.

माझं ऑफिसमधून राजीनामा देऊन बाहेर पडणं हे तिला माहित नव्हतं. त्यामुळे ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तिथून बाहेर पडल्यावर तिचा मला फोन येणार हे अपेक्षित होत.. पण मी राजीनामा का दिला ह्यावर चर्चा होऊ नये म्हणून मी कोणत्याही सहकाऱ्यांचे फोन घेऊ नयेत अस मला सांगण्यात आल होत. आणि तसंच झालं.. तिचा फोन आला, बेल वाजत राहिली.. मी फक्त पाहत राहिले अन् फोन घेतला नाही.. त्यानंतर काही दिवसांनी वाटलं कि फोन करावा अन बोलावं पण परत चर्चेला कारण नको म्हणून फोन केला नाही.

आता अशी परिस्थिती आहे कि एक वेळ फोन वाजेल.. फोन उचाललादेखील जाईल पण पलिकडेच काय मानसीचा आवाज  कुठेच नसेल.. कारण ती कायमचीच निघून गेली एकटीच तिच्याच प्रश्नाची उत्तरे शोधत किंवा अनुत्तरीत प्रश्नांसहित.. आणि माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह ठेवून कि मॅडम माझा फोन तुम्ही त्या दिवशी का उचलला नाही?

ह्या एका प्रश्नाने मी स्वतः खूप अजूनही बेचैन होते आणि म्हणूनच सांगते कायम मनाचं ऐका कारण माणसं एक वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला चार गोष्टी करायला सांगतील पण त्यावर तुमच मन हे तुम्हाला कायम योग्यच सांगेल.. माझ्या मनाने मलाही कौल तेव्हा हा तिचा फोन उचल असाच दिला होता पण..

आणि आता ह्यावर बोलून काहीच फायदा नसला तरी व्यक्त होऊन तिची माफी मागावी असं निश्चित वाटलं आणि म्हणून हि माझी चार वाक्य..

मानसी तुझी आठवण हि कायम तुझ्या बडबडीइतकीच येत राहील तुझ्या अनुत्तरीत प्रश्नासहित.. !!

..

Sunday 12 March 2017

मन..

मनात बरेच काही करण्याची इच्छा असते,पण कधी वेळ तर कधी परिस्थिती साथ देत नाही,
आणि मग सुरु होतो आपलाच आपल्या मनाशी संघर्ष...
आपली इच्छा  आणि कार्यक्षमता कमी पडतेय कि काय असं जाणवायला लागतं
आणि सुरु होतो खटाटोप आपल्यातील हि उणीव लपवण्याचा,
पण आपण त्यातही अपयशीच ठरतो कारण आपल्यात एक मन असतं जे आपल्याला शांत बसून देत नाही,
कारण ते धाव घेत असतं आजूबाजूच्या मनांचा आणि गोष्टींचा.

मी मनमुक्ता..
८ एप्रिल २०२३

Monday 23 January 2017

ना समजले कधी, केंव्हा, कसे जुळले हे भावबंध..
अतूट राहतील आपल्यातील ऋणानुबंध..