Tuesday 30 October 2018

हिमालयाचे वारकरी वसंत वसंत लिमये...

वसंत वसंत लिमये म्हटलं कि एक ठाणेकर, आयआयटीअन, एक लेखक आणि हाय प्लेस मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा हे समीकरण आहेच पण याचबरोबर अत्यंत दिलखुलास, बेधडक, उत्साही, सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास असणारे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते... कायम समोरील माणसाच्या मनात कुतूहल निर्माण कसं करायचं याचं गुपित समजलेले एक अभ्यासू लेखक म्हणजे वसंत वसंत लिमये...!!!

यांच्या भेटीचा तसं म्हणाल तर योग नोकरीत असताना फारसा आला नाही. पण त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा मात्र नक्कीच होती. अर्थात त्याचे कारण पण त्याच्याच “कॅम्पफायर” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हेच होते ..!!! पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असाही असू शकतो याचा प्रत्यय मला तेंव्हा आला. आणि त्यामुळेच त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली तर किती छान होईल असं वाटत होत.. हि सुप्त इच्छा तेव्हापासुनचीच...!!!

पण म्हणतात ना प्रत्त्येक गोष्टीची एक वेळ असते. माझं तसच झालं... फ्रीलान्सिंग म्हणून काम करायचं ठरवलं आणि एक दिवस त्यांची वेळ घेतली आणि माझ्या मनातील कल्पना त्यांच्यासमोर मांडली. माझं सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यावर त्यांनी माझ्यापासूनच तू या कामाला सुरुवात कर असं सांगितलं आणि माझ्या नवीन कामाचा श्रीगणेशा झाला. आता या गोष्टीला एक वर्ष होऊन गेले. पण या एक वर्षात त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळालं. वक्तशीरपणा, मग तो काम पूर्ण करण्याच्या बाबतीत असो किंवा मिटींगसाठी असो, वेळोवेळी आजपर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा देणे हे असो तो महत्वाचा... सर्वात महत्वाचे म्हणजे कल्पकता...!!! मल्टीटास्किंग कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकावं... कितीही कामाच्या व्यापात असले तरी एसएमएसला त्यांचे उत्तर हे येणारच...!!!

एकीकडे हे सर्व शिकत असताना “विश्वस्त” या पुस्तकाचे विविध कार्यक्रम चालू होते त्यासंबंधित कामे करत असताना एक दिवस अचानक “हिमयात्रा २०१८” या मोहिमेची माहिती त्यांनी मला दिली. त्यासाठीची लागणारी प्रचंड तयारी, मिनिटामिनिटाचे आखलेले वेळापत्रक, त्यासाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव, त्यांच्याबरोबर प्रत्त्येक आठवड्यात बदलले जाणारे त्यांचे जे सहकारी होते, त्यांना कुठे, कसे, कधी भेटायचं हे वेळापत्रक, त्याची आखणी हे सर्व पाहून मी थक्क झाले. या २ महिन्याच्या मोहिमेत त्यांच्या “हिमयात्रा २०१८” या फेसबुक पेजवर वेळोवेळी त्यांच्या या मोहिमेचे अपडेट्स छायाचित्राच्या रुपात त्यांच्या चाहत्यांना देण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी मला दिली. हे सर्व काम करताना मनात आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलू शकत आहोत याचे समाधान वाटत होते. त्यांची हि हिमयात्रा हि फक्त फिरण्याइतकीच मर्यादित राहणार नाही याचा अंदाज होताच आणि तो बरोबरच होता...!!! कारण, दोन महिन्याच्या मोहिमेनंतर असंख्य कल्पनांसहितच आमची मीटिंग झाली आणि “साद हिमालयाची” या कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली.

“साद हिमालयाची” हा वसंत वसंत लिमये यांच्या “हिमयात्रा २०१८” या मोहिमेचा दृकश्राव्य अनुभव देणारा, तेथील अनुभव आणि वाचक, प्रेक्षक, चाहते मंडळींशी संवाद साधणारा अंदाजे २ तासाचा कार्यक्रम आहे. याचा पहिला कार्यक्रम २३ ऑगस्ट २०१८ रोजी अभ्यास गटा तर्फे ठाकूर धाम येथे झाला. छान गप्पा, प्रश्नोत्तरे झाली. सर्वजण हिमयात्रेत दंगून गेले. हळू हळू अशा कार्यक्रमाविषयी चौकशीचे फोन, ई-मेल, येऊ लागले. अर्थात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचं सहकार्य निश्चितच आहे.

दुसरा कार्यक्रम ४ ऑक्टोबर २०१८ रोजी विष्णूकृपा सभागृहात सरांच्या रुपालीतील मित्रमंडळीनी आयोजित केला होता. यात पुढाकार हेमंत सोमण आणि वर्तक बंधू यांनी घेतला तर वर्षां चाफेकर वर्तक हिने छान मुलाखतवजा गप्पा मारल्या. तिसरा ठाण्यात होणारा कार्यक्रम लगेचच ४ दिवसांनी असल्यामुळे उत्कंठा होतीच.

तिसरा कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०१८ रोजी सहयोग मंदिर, ठाणे येथे झाला ज्यात वसंत वसंत लिमये आणि . डॉ .आनंद नाडकर्णी असे दोघेही होते. त्यांची मुलाखत मुलाखतकार:- शिरीष अत्रे यांनी घेतली. मुळचे ठाणेकर असल्याने या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉल पूर्ण प्रेक्षकांनी भरला होता. शिरीष अत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उत्तम पद्धतीने दिली. कार्यक्रमाची  रंगत वाढली ती सिक्कीम ते लडाख प्रवासाची क्षणचित्रे आणि त्याला अनुसरून निवेदन असलेल्या छोट्या फिल्मने. थोडक्यात ह्या दृकश्राव्यानुभवातून सर्वांना ‘सिक्कीम ते लडाख’ हा जणू प्रवासच घडला....!!!

चौथा कार्यक्रम १९ ऑक्टोबर २०१८ रोजी 'आदित्य रसिक वाचक गट' तर्फे 'आदित्य गार्डन सिटी' येथे झाला. या कार्यक्रमात वसंत वसंत लिमये सरांसोबत त्यांच्या हिमयात्रेत सहभागी झालेल्या मराठी सीरिअल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम सर्वांच्या लाडक्या “नानी” म्हणजेच सुहिता थत्ते देखील होत्या. त्यांच्यासोबत विश्वेश जिरगाळे यांनी मारलेल्या गप्पा चांगल्याच रंगल्या.

असा गप्पा, प्रश्नोत्तरे आणि ‘सिक्कीम ते लडाख’ ह्या प्रवासाचा अनुभव दृकश्राव्यातून देणारा वसंत वसंत लिमये सरांचा “साद हिमालयाची” हा कार्यक्रम विविध शहरात आणि देशांत होवो या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

Saturday 4 August 2018

निमित्त "कच्चा लिंबू"चे

स्पेशल आईबाबा निमित्त "कच्चा लिंबू"

प्रत्त्येक आई वडिलांसाठी आपलं मुल हे स्पेशल असतं. त्याला वाढविताना एखादी गोष्ट आपल्याला कमी घेता आली तरी चालेल पण आपल्या मुलीला / मुलाला काही कमी पडणार नाही याची काळजी सर्वतोपरी ते घेत असतात. तसेच माझे हे स्पेशल आई बाबा..

पहिलं पाउल टाकण्यापासून, तसेच माझ्या नोकरीच्या काळात अडचणीच्या वेळी माझ्या मुलाला सांभाळण्यापासून ते अगदी आज हे माझे लहानपणाचे फोटो शेअर करण्यापर्यंत माझ्यासाठी  माझ्याबरोबर कायम असतात ते माझे आई बाबा..

दोघांनाही घरची आणि आर्थिक जबाबदारी असल्याने नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे काही वर्ष मला पाळणाघरात ठेवावं लागलं हि खंत कायम बोलून दाखवणारी आई.. जी मला पाळणाघरात सोडून जाताना अनेकदा स्वतःचे डोळे पुसत जायची आणि मला परत घेण्यासाठी संध्याकाळी साडेपाच हि वेळ काहीही करून गाठायची.. त्या काळात त्यांच्या परीने जितके लाड करता आले ते दोघांनीही केले.. आईने  त्याकाळातील वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे शिवून स्वेटर विणून सर्व हौस केली..

तसेच बाबा.. गाण्याची स्वतःला ऐकण्याची आवड, त्यात रेकॉर्ड जमवण्याचा छंद असल्याने लहानपणापासून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळाली त्यामुळेच गाण्याची आवड उत्पन्न झाली.आज जे काही गाण समजत ते तुमच्यामुळे.. नातेवाईकांबरोबर मैत्रिणी मित्र परिवार पण महत्वाचा असतो हे ते त्यांच्या अडचणीच्या काळात आलेले अनुभव सांगून कायम सांगायचे त्यामुळे नातेवाईकांइतकाच मोठा मित्रमैत्रिणी परिवार आजूबाजूला कायम असतो..

शेअरिंग मग तो खाऊ असो किंवा फटाके असो त्याने आनंद द्विगुणीतच होतो.. जग कसेही वागो आपण चांगलच वागावं, कायम हसमुख असणारे आणि कायम सकारात्मक विचार करणारे आणि नोकरीमधून निवृत्त झाल्यावर स्वतःकरता एकमेकांकरता आणि सर्वासाठी वेळ देणारे असे हे माझे स्पेशल आई बाबा.. तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि तुमची साथ आणि आशीर्वाद अशीच ह्या पुढे आम्हाला लाभो हीच देवाकडे प्रार्थना..  !!
:) :)


#स्पेशलआईबाबा#KacchaLimbu

Friday 20 July 2018

तुम्ही एखाद्याला किती वेळ देता, यापेक्षाही मिळालेल्या वेळेत काय देऊन जाता हे महत्वाच...

@ मी मनमुक्ता...

Thursday 5 April 2018

तळमजला..

बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते खरं आहे. आता जेंव्हा समवयीन बालपणीचे मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा जुन्या आठवणींना अगदी सहजपणे उजाळा दिला जातोच.. अशीच एक आठवण – आठवण तळमजल्याची..!!
पूर्वी मोठमोठाले कॉम्प्लेक्सची संस्कृती नव्हती तरी त्यामानाने आम्ही जिथे राहायचो ती सोसायटी हि मोठीच म्हणायची. म्हणजे साधारण २५ बिऱ्हाडे होती. अंदाजे इयत्ता चौथी पर्यंत मी माझ्या आजीकडेच राहायला आणि सांभाळायला होते त्यामुळे सोसायटीमधील सर्वांशीच खूप संपर्क नसायचा. हा मात्र ठराविक घर अशी आहेत जिथे माझा मुक्काम नक्की असायचा. थोडक्यात सांगायचं तर पडिक असायचे मी.. ती घरं म्हणजे देसाई आणि टिकेकर काका काकू यांचे.. जणू काही तीदेखील माझीच घर आहेत अशा थाटात माझा वावर असायचा. आणि तो वावर इतका सहज असायचा कि त्यांच्याकडील येणारे पाहुणे पण विचारायचे कि तुमची मुलगी का?
गणपतीमध्ये देसाई काकूंकडे मला राहायचं असायच कारण त्यांच पाहुण्यांनी भरलेलं घर, गप्पा, एकत्र मिष्टान्न जेवण आणि त्यांचे पुतणी पुताण्यांबरोबर खेळ आणि गप्पा असा बेत मला कायम खुणावायचा. त्या काळात आई कटाक्षाने पढवून पाठवायची मला कि “आरती झाली, प्रसाद काकुनी दिला कि तडक घरी यायचं. जेवायला थांबायचं नाही.” पण नाही !! तसं कधीच व्हायचं नाही. काकूंनी आणि काकांनी सांगितलं कि त्यांच सांगण लगेच ऐकायचे आणि तडक शेजारी टिकेकर काकुच्या घरात जाऊन खिडकीतून आईला हाक मारायचे व ताट दाखवून ओरडायचे “आई आजच्या दिवसच जेवते ना !” हा संवाद अर्थात तळमजला आणि पहिला मजला असा चालायचा आणि पूर्ण सोसायटीला समजायचं कि मी आज देसाई काकूंकडे जेवणार आणि दुसरं म्हणजे “आजच्याच दिवस” हे गणपतीचे सातही दिवस असायचं कारण काकुकडे गौरी गणपती असायचे.

हि आठवण माझ्या एकटीची माझ्या पुरतीच फक्त माझीच..!! पण मग जसजसे मोठे होत गेलो सोसायटीमधील सर्व मित्रमंडळी चांगली परिचयाची झाली. हळूहळू शाळेतून घरी आल्यावर पोटात एकदाच काही ढकलून कधी खाली खेळायला जाऊ असं व्हायला लागलं..!! कारण रोज एक नवीन खेळ खेळायचं आकर्षण.. !! कारण प्रत्येक खेळाचा प्रमुख वेगळा असायचा..!! कधी बॅडमिंटन, आंधळी कोशिंबीर, चीनची भिंत, लगोरी, डबाइसपैस, खांब खांब खांबोळी, लंगडी, टीपी टीपी टीप टॉप, हे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. हे सर्व खेळत असताना आमच्या खेळण्याच्या वस्तू, रुमाल, चपला, रॅकेट्स, या वस्तू नीट ठेवण्यासाठी कायम आम्ही तळमजल्यावर राहणाऱ्या सर्वांनाच आणि मुख्यत्वे टिकेकर आणि देसाई काका काकूंना खूप त्रास द्यायचो. उन्हाळ्याच्या दिवसात तर इतके वेळा आम्ही पाणी पिण्यासाठी जायचो आणि ते पण अगदी आनंदाने गार पाणी कधी माठातील किंवा फ्रीजमधील प्यायला द्यायचे. हे करत असताना कधीच त्यांनी कंटाळा केला नाही. ऑफिसमधून दमून आलेले असले तरी कधी चिडले नाही. कधी कधी दोन्ही काकू आम्हाला खेळून दमला असाल म्हणून गोळी, चॉकलेट, बिस्कीट किंवा काही खाऊ हातावर ठेवायच्या. कधी कधी वेळेप्रसंगी ओरडायच्या पण ते देखील आमच्या चांगल्यासाठीच.. कारण खेळायला जाण्याची घाई असल्यामुळे उभ्याने पाणी पिऊन पाळायच असायचं.. मग काकूच वाक्य कानावर यायचं “अरे/ अग हळू आणि बसून पाणी प्या..!! नाहीतर पोटात दुखेल.” त्यावर “काही नाही दुखत..” असं म्हणून पळून जायचो. हे शाळा असो किंवा सुट्ट्या असो कायमच असायचं.
सुट्ट्यांमध्ये तर हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळचा उपक्रम फक्त सुट्ट्यांमध्ये सकाळसाठी तळमजल्याची घर बदलायची... मग आम्ही लेले, सुबंध, कुलकर्णी परांजपे, सोपारकर यांना त्रास द्यायचो. या सर्वांनीच आमचे हे त्रास प्रेमाने सहन केलेच पण वेळेप्रसंगी कोणाला लाही लागलं, खुपलं तर औषध, मलमपट्टी देखील केली. यातूनच आमचं या सर्वांशीच एक वेगळच नात निर्माण झालं.

जसजसे मोठे झालो कॉलेज सुरु झाले मग हे सर्व खेळ बंद झाले पण कॉलेजमधून येता जाता काका काकुंना हॅलो म्हणून पुढे जायचो. मग खेळण्याचे साहित्य, रुमाल, चप्पल या वस्तूंची जागा घराच्या किल्ल्या/ चावी, वेळप्रसंगी काही निरोप यांनी घेतली. कॉलेजमधून किल्ली घ्यायला गेले कि पाणी प्यायला थांबायचे तेंव्हा घरचे कॉलेजच्या आणि इतर गप्पा व्हायच्या त्यात अर्धा तास कसा जायचा समजायचं नाही.. अशातच कधी वरच्या मजल्यावरची गोखले काकू छान उन्ह खात भाजी घेऊन येताना दिसायची, कोणी शाळेसाठी निघालेलं असायचं आणि अशातच परत तिथेच गप्पांचा अड्डा जमायचा.

या सर्वांना दिवाळीत सर्वात जास्त त्रास आम्ही दिला असेल. कारण सुट्टी लागली कि किल्ला करणे यासाठी पाण्याच्या बादलीपासून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतील त्या आम्ही मागायचो. आणि सर्वात कहर म्हणजे दिवाळीची पहाट.. पहिला अटमबॉम्ब कोण लावणार?? आम्ही म्हणायचो आम्ही लावणार पण तसं व्हायचाच नाही कारण इतक्या पहाटे उठायचोच नाही आणि बहुदा तो ‘सुशील कुलकर्णी’ किंवा ‘राहुल कुलकर्णी’च पहाटे ५ ला उठून लावायचे आणि मग आमची सुरुवात..!! जणू काही तो नियमच असावा सर्व प्रांजालीकारांना उठवण्याचा..!! तसच आमच्या मैत्रिणी आल्या नाही वेळेवर किंवा बाहेर जाण्यासाठी हाक मारायची झाली तर तीदेखील काकुच्या इथे उभी राहूनच जोरात हाक मारायची कारण तिथून हाक मारली कि आमचा आवाज घुमायचा.. त्याची आंम्हाला मजा वाटायची पण हे करताना, फटाके उडविताना त्यांना किती त्रास झाला असेल हा विचार तेंव्हा मनात कधीच आला नाही.. पण आता नक्कीच येतो. कारण कॉलेज संपल्यावर कोणाचे पुढचे शिक्षण, कोणाची नोकरी आणि मग लग्न होऊन एक एक जण मुख्यत्वे मुली सासरी गेल्या आणि काही दुसऱ्या नवीन मोठ्या जागेत राहायला गेले. माझंही फारस जाण आता होत नाही पण जेंव्हा जाते तेव्हा येता जाता खिडकीत टिकेकर काका काकू आहेत का हे पाहिलं जातं. असतील तर कधी खिडकीत उभे राहूनच गप्पा आणि चौकशी केली जाते. पण आता पूर्वीसारखा आमचा चहाचा अड्डा कधीतरीच जमतो.

हे सगळं एकीकडे घडत गेलं असलं तरी तळमजल्यावरची घर तशीच आहेत. त्यातील माणस काही आहेत, काही आता आपल्यात नाहीत, तर काही जागा सोडून गेले आणि तिथे नवीन बिऱ्हाडकरू आले. वेळेनुरूप संदर्भ बदलले. आता जेवढे तळमजल्यावर आमचे हक्काचे काका काकू आहेत त्यांचेही हात आणि डोळे थकले आहेत. हातात काठी, कंबरेला पट्टा आला आहे. हे सर्व जरी असलं तरी उत्साह मला लाजवेल असा आहे. कारण अजूनही “ये ग चहा प्यायला.. गप्पा मारायला असं म्हटलं जातच.!!” जे अजून तिथे आहेत त्यांना आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी नक्कीच आठवत असतील.. आत्ता हे लिहित असतानाच मी परत एकदा लहान झाले. मन भावूक झालं. यासाठी कि जगलेले हे क्षण परत येणार नाहीतच पण असे क्षण, हे खेळ, असा छान शेजार आपल्या मुलांना नक्कीच लाभणार नाही. आपण जरी हे क्षण जगलेले असलो आणि आपण जरी फेसबुक, व्होट्सअप, मोबाईल अशा अनेक माध्यमांमधून जोडले गेलो असलो तरी संवाद साधण्यासाठी वेळ सर्वांकडे आहेच असं नाही. आपली सोसायटी “प्रांजली” लवकरच कात टाकेल असे वारे वाहू लागले आहेत. म्हणजे तिथे आता मोठा १० - ११ मजल्याचा कॉम्प्लेक्स तयार होईल. जेंव्हा कोणतीही माध्यमे नसताना आपण एकमेकांना इतके जोडले गेलो होतो तेच आपण इतकी माध्यमे असताना देखील मनाने दूरच आहोत असं वाटत आणि हा टोलेजंग कॉम्प्लेक्स झाल्यावर आपल्यातील संवाद आणि आपल्याशी संवाद साधणारा तळमजला पण आपल्या प्रमाणेच बंदिस्त होईल कि काय असं वाटतय.
फेसबुकवरून फिलिंग हॅपी स्टेट्स टाकणारे किंवा चेक इन टू आणि लाईक करण्याच्या या जगात राहणारे आपण आपलं बालपण, तळमजला, तिथे राहणारी माणस यांना नुसत्या आठवणीतच नाही तर संवादातून जपूया.. फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी.. आपल्या आई बाबांसाठी.. आपल्या लाडक्या शेजार्यांसाठी.. !!
तुम्हाला काय वाटत.??

स्वप्ना..

Thursday 22 March 2018

"गुलाबजाम" - चव मनात आणि जिभेवर रेंगाळणारी ...!!

गोड खायला कोणाला आवडत नाही ? पण हाच गोडवा चित्रपटांमध्ये आला किंवा चित्रपटाच नाव हेच एका गोड पदार्थाच असेल तर काय मजा ना..!! अगदी बरोबर ओळखलत.. तुम्हाला वाटलं त्याच चित्रपटाबद्दल बोलतेय.. नाव अर्थात "गुलाबजाम" !!

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या चित्रपटाच ट्रेलर पाहिलं.. अर्थात ते पाहूनच ठरवलं कि हा चित्रपट नक्की पहायचा. कारण त्याची अनेक..! एक म्हणजे चित्रपटाच नाव हि माझी ऑल टाईम फेवरेट स्वीट डिश.. त्यात दोन्हीही कलाकार आवडीचे.. आणि चित्रपटचा ट्रेलर अत्यंत गोड..

चित्रपट समीक्षक मी अजिबात नाही पण माहित नाही का लिहावसं वाटलं या चित्रपटाविषयी म्हणून थोडसं माझं मत.

मराठी चित्रपटाचा दर्जा हा दिवसेंदिवस जास्त उच्च होत आहे. वेगवेगळे प्रयोग देखील होत आहे. आणि "गुलाबजाम" हा चित्रपट प्रदर्शित करून या टीम ने महाराष्ट्रीयन पदार्थ किंवा जेवण हे सात समुद्रापलीकडे नेण्याचा प्रयत्न खूप छान केला. तो आवडला आणि यशस्वी देखील झाला असं मला तरी वाटतं..

त्यात सोनाली कुलकर्णी ( राधा ) आणि सिध्दार्थ चांदेकर ( आदित्य ) यांच्यातील संवाद, त्यांचा अभिनय, आणि त्यांच्यात वेगळच निर्माण झालेलं तरल नात ( ज्याला नाव देण योग्य नाही ) त्यातील सात्विकता हि खूप भावली.

आपल्या महाराष्ट्रीयन खाण्यामध्ये इतकी विविधता आहे आणि ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाल्याचा आनंद काही वेगळाच होता. त्याक्षणी भूक आवरली नाहीच पण "तोंडाला पाणी सुटणे" हि म्हण आठवली आणि कशाला असतं हे डाएट असं पण वाटलं.

पदार्थ बनविताना असणारे ( background sound ) एकदम सुरेख..!!

चित्रपट म्हणजे नक्की असतं तरी काय एक निखळ मनोरंजन.. !! पण माझ्या मते चित्रपट म्हणजे ३ तास फक्त खुर्चीला खिळवून ठेवणे असे नसून त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा हे दुसरं तिसरं कोणी नसून आपणच आहोत असे समजून ते ३ तास आपण जेंव्हा तो पूर्ण चित्रपट जगतो तो खरा चित्रपट.. "गुलाबजाम" पाहताना हा अनुभव नक्कीच आला.

अजूनही हा चित्रपट कोणाचा पाहायचा राहिला असेल तर नक्की पहा..!! मनात एक गोडवा साठवूनच चित्रपटगृहातून बाहेर याल.. :) आजही मनात या "गुलाबजाम" ची चव मनात अजूनही रेंगाळत आहे आणि अशीच राहील.

"गुलाबजाम" च्या सर्व टीम आणि सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन..!!

स्वप्ना..

https://www.facebook.com/GoldenGateMotionPictures/videos/2071048423114137/?t=26