Tuesday 30 October 2018

हिमालयाचे वारकरी वसंत वसंत लिमये...

वसंत वसंत लिमये म्हटलं कि एक ठाणेकर, आयआयटीअन, एक लेखक आणि हाय प्लेस मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा हे समीकरण आहेच पण याचबरोबर अत्यंत दिलखुलास, बेधडक, उत्साही, सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास असणारे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते... कायम समोरील माणसाच्या मनात कुतूहल निर्माण कसं करायचं याचं गुपित समजलेले एक अभ्यासू लेखक म्हणजे वसंत वसंत लिमये...!!!

यांच्या भेटीचा तसं म्हणाल तर योग नोकरीत असताना फारसा आला नाही. पण त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा मात्र नक्कीच होती. अर्थात त्याचे कारण पण त्याच्याच “कॅम्पफायर” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हेच होते ..!!! पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असाही असू शकतो याचा प्रत्यय मला तेंव्हा आला. आणि त्यामुळेच त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली तर किती छान होईल असं वाटत होत.. हि सुप्त इच्छा तेव्हापासुनचीच...!!!

पण म्हणतात ना प्रत्त्येक गोष्टीची एक वेळ असते. माझं तसच झालं... फ्रीलान्सिंग म्हणून काम करायचं ठरवलं आणि एक दिवस त्यांची वेळ घेतली आणि माझ्या मनातील कल्पना त्यांच्यासमोर मांडली. माझं सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यावर त्यांनी माझ्यापासूनच तू या कामाला सुरुवात कर असं सांगितलं आणि माझ्या नवीन कामाचा श्रीगणेशा झाला. आता या गोष्टीला एक वर्ष होऊन गेले. पण या एक वर्षात त्यांच्याकडून बरच काही शिकायला मिळालं. वक्तशीरपणा, मग तो काम पूर्ण करण्याच्या बाबतीत असो किंवा मिटींगसाठी असो, वेळोवेळी आजपर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा देणे हे असो तो महत्वाचा... सर्वात महत्वाचे म्हणजे कल्पकता...!!! मल्टीटास्किंग कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकावं... कितीही कामाच्या व्यापात असले तरी एसएमएसला त्यांचे उत्तर हे येणारच...!!!

एकीकडे हे सर्व शिकत असताना “विश्वस्त” या पुस्तकाचे विविध कार्यक्रम चालू होते त्यासंबंधित कामे करत असताना एक दिवस अचानक “हिमयात्रा २०१८” या मोहिमेची माहिती त्यांनी मला दिली. त्यासाठीची लागणारी प्रचंड तयारी, मिनिटामिनिटाचे आखलेले वेळापत्रक, त्यासाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव, त्यांच्याबरोबर प्रत्त्येक आठवड्यात बदलले जाणारे त्यांचे जे सहकारी होते, त्यांना कुठे, कसे, कधी भेटायचं हे वेळापत्रक, त्याची आखणी हे सर्व पाहून मी थक्क झाले. या २ महिन्याच्या मोहिमेत त्यांच्या “हिमयात्रा २०१८” या फेसबुक पेजवर वेळोवेळी त्यांच्या या मोहिमेचे अपडेट्स छायाचित्राच्या रुपात त्यांच्या चाहत्यांना देण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी मला दिली. हे सर्व काम करताना मनात आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलू शकत आहोत याचे समाधान वाटत होते. त्यांची हि हिमयात्रा हि फक्त फिरण्याइतकीच मर्यादित राहणार नाही याचा अंदाज होताच आणि तो बरोबरच होता...!!! कारण, दोन महिन्याच्या मोहिमेनंतर असंख्य कल्पनांसहितच आमची मीटिंग झाली आणि “साद हिमालयाची” या कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली.

“साद हिमालयाची” हा वसंत वसंत लिमये यांच्या “हिमयात्रा २०१८” या मोहिमेचा दृकश्राव्य अनुभव देणारा, तेथील अनुभव आणि वाचक, प्रेक्षक, चाहते मंडळींशी संवाद साधणारा अंदाजे २ तासाचा कार्यक्रम आहे. याचा पहिला कार्यक्रम २३ ऑगस्ट २०१८ रोजी अभ्यास गटा तर्फे ठाकूर धाम येथे झाला. छान गप्पा, प्रश्नोत्तरे झाली. सर्वजण हिमयात्रेत दंगून गेले. हळू हळू अशा कार्यक्रमाविषयी चौकशीचे फोन, ई-मेल, येऊ लागले. अर्थात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचं सहकार्य निश्चितच आहे.

दुसरा कार्यक्रम ४ ऑक्टोबर २०१८ रोजी विष्णूकृपा सभागृहात सरांच्या रुपालीतील मित्रमंडळीनी आयोजित केला होता. यात पुढाकार हेमंत सोमण आणि वर्तक बंधू यांनी घेतला तर वर्षां चाफेकर वर्तक हिने छान मुलाखतवजा गप्पा मारल्या. तिसरा ठाण्यात होणारा कार्यक्रम लगेचच ४ दिवसांनी असल्यामुळे उत्कंठा होतीच.

तिसरा कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०१८ रोजी सहयोग मंदिर, ठाणे येथे झाला ज्यात वसंत वसंत लिमये आणि . डॉ .आनंद नाडकर्णी असे दोघेही होते. त्यांची मुलाखत मुलाखतकार:- शिरीष अत्रे यांनी घेतली. मुळचे ठाणेकर असल्याने या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉल पूर्ण प्रेक्षकांनी भरला होता. शिरीष अत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उत्तम पद्धतीने दिली. कार्यक्रमाची  रंगत वाढली ती सिक्कीम ते लडाख प्रवासाची क्षणचित्रे आणि त्याला अनुसरून निवेदन असलेल्या छोट्या फिल्मने. थोडक्यात ह्या दृकश्राव्यानुभवातून सर्वांना ‘सिक्कीम ते लडाख’ हा जणू प्रवासच घडला....!!!

चौथा कार्यक्रम १९ ऑक्टोबर २०१८ रोजी 'आदित्य रसिक वाचक गट' तर्फे 'आदित्य गार्डन सिटी' येथे झाला. या कार्यक्रमात वसंत वसंत लिमये सरांसोबत त्यांच्या हिमयात्रेत सहभागी झालेल्या मराठी सीरिअल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम सर्वांच्या लाडक्या “नानी” म्हणजेच सुहिता थत्ते देखील होत्या. त्यांच्यासोबत विश्वेश जिरगाळे यांनी मारलेल्या गप्पा चांगल्याच रंगल्या.

असा गप्पा, प्रश्नोत्तरे आणि ‘सिक्कीम ते लडाख’ ह्या प्रवासाचा अनुभव दृकश्राव्यातून देणारा वसंत वसंत लिमये सरांचा “साद हिमालयाची” हा कार्यक्रम विविध शहरात आणि देशांत होवो या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

No comments:

Post a Comment