Tuesday 27 August 2019

दाद

दाद.

प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या कलेची आवड असते. काळानुरूप किंवा काम, करियर, संसार या सर्व गोष्टीत ती जोपासली जातेच असं नाही. पण अशीही काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात जी कला जिवंत ठेवण्यासाठी किंवा स्वतःला नुसती आवड आहे म्हणून दुसऱ्यांना कायम प्रोत्साहन देतात.

केदार आणि माझी ओळख 2 वर्षांपूर्वीची, ती देखील आमच्या सवाई गंधर्व चा ग्रुप आहे त्यात तो सामिल झाल्यामुळे झालेली. हा पेशाने वकिल असला तरी संगीताची आवड. कोर्टामधे भले न्यायाधीशसमोर मोठ मोठ्याने हा आपल्या अशिलाची बाजु मांडत असेलही पण ग्रुप मधे तसा शांतच म्हणून ओळखला जातो. नाटकाची आवड म्हणजे परफॉर्म करण्याची हौस आहे हे याच वर्षी समजल.

ओळख जितकी जुनी होत जाते तसतस आपण माणसांना जास्त ओळखू लागतो त्याचप्रमाणे त्याच्या काही स्वभावांचे पैलुही हळूहळू कळायला लागतात. केदार तू मनाने पण तितकाच मोठा असशील हे मागील आठवड्यात आपल्या व्हाट्सअप च्या ग्रुप वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ वरुन पक्क झालं.

झालं असं की केदार पनवेलचा. तालुका पोलिस स्टेशनच्या बाजूला एक चांभारवाला बसतो ज्याला बासरी वाजवताना त्याने ऐकला होत आणि त्याने स्वतः पण थांबून ऐकल होतं त्याचं बासरी वादन पण चप्पल दुरुस्तीचा योग कधी आला नव्हता, जो मागील आठवड्यात आला. मग काय केदार वकिल सोडतोय का चांभाराला!!! केसच्या जशा तारीख पे तारीख पडत जातात त्याप्रमाणेच केदार ने त्या चांभाराला य प्रश्न विचारले.

अत्यंत साध्या कुटुंबातील, बायका पोरांची जबाबदारी असणारा चांभार अंदाजे दिवसाला चप्पल शिवुन 400/- कमावत असेल. पण बासरीची मनापासून आवड असल्याने केदारने बासरीचा विषय काढल्यावर चेहरा त्याचा खुलला आणि तो त्याविषयी बोलू लागला. त्याने केदार ला "पंख होते तो उड आती रे' हे गाणं देखील वाजवून दाखवले. चांभार वाजवत असलेली बासरी ही उन्हामुळे आणि आताच्या दमट हवेमुळे थोड़ी वाकडी झाली होती पण तरीही त्यातून तो फार सुरेल सुर उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता जेंव्हा काही ठिकाणी ते योग्य लागत नव्हते तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरील खंत स्पष्ट केदारला दिसत होती.

इतकं सुंदर वाजवतोस तर छान शिकत का नाही? असा प्रश्न केदारन विचारला खरा पण, त्यावर, " साहेब जेमतेम पोटापुरते पैसे मिळतात, त्यात हे लाड कुठून करायचे?!!!" अस उत्तरुन त्याने वास्तवतेची जाणीव करून दिली. ते ऐकून केदार घरी यायला निघाला पण त्याच्या डोळ्यासमोर त्या चांभाराचा चेहरा आणि त्याचं शेवटच वाक्य मनात घर करून राहिलं. त्याच मनस्थितीत माझ्यामते हा अनुभव त्याने आमच्या व्हाट्सअप च्या ग्रुप वर लिहून पोस्ट केला. आणि पुढे लिहिल की त्या चांभारला मी बासरी घेऊन देणार. त्याने लिहिलेल्या या अनुभवाच आम्ही सर्वांनीच कौतुक केलं. पण मला असही वाटलं की हा इतका त्याच्याच रूटीन मधे व्यग्र असतो कधी बरं हा त्या चांभारासाठी बासरी आणेल. पण त्याने त्याचं बोलण खरं करून दाखवलं. गोकुळअष्टमी सारखा छान दिवस गाठून त्याने त्या चांभाराला बासरी विकत घेऊन त्याकडे सुपूर्त केली.

इतकच नाही तर त्याच्या पोस्ट वर मी तेंव्हा लिहिलं होतं की जेंव्हा त्याला बासरी देशील तेंव्हा त्याला ती वाजवायला सांग आणि त्याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड कर. आणि केदार ने तसं केलही. त्याच्या या उत्साहाला सलाम!!! आणि एखाद्याच्या अंगी असलेल्या कलेला अशा प्रकारे दाद देण्याची कल्पना खुप आवडली. त्याचा हा उत्साह पाहून माझी मैत्रिण अश्विनी हिनेही मी काहीतरी यावर लिहावं असं सुचवल.

मग काय असा कलाकार आणि दाद देणारे असे हे माझे मित्र मैत्रिण यांच्या कौतुकासाठी माझी हि पोस्ट - दाद!!!

©️स्वप्ना शेंडे भिडे.
२७ ऑगस्ट २०१९


No comments:

Post a Comment