Thursday 30 January 2020

मायेची ऊब.

मायेची ऊब

कितीही काही झालं तरी जगात एक व्यक्ती अशी प्रत्त्येकाच्याच आयुष्यात असते जी जवळ नसली तरी तिची आठवण नक्कीच सोबत असते. इतकच काय तर आपल्याला अगदी लागलं तरी पहिला शब्द येतो तो आई ग !

तर अशा अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तीचा म्हणजेच माझ्या आई चा काल वाढदिवस होता.. कितीही मतमतांतरे झाली, वाद झाले, कामे न करण्यावरून,फोनवर गप्पा मारण्यावरून घरी वेळेत न आल्यामुळे तिचा ओरडा खाल्ला तरी हिच्याशिवाय पान हलत नाही. लहान असताना मी माझ्या आजीकडे म्हणजे आईच्या आई कडेच जास्त असल्याने आणि आईच्या नोकरीमुळे खुप लहान असतानाच्या तिच्याबरोबरच्या आठवणी आठवत नाही. पण, तिने माझ्यासाठी केलेले लाड मग ते विविध फॅशनचे कपडे असोत किंवा तिच्या हातचा केक असो. ड्रेस वर मॅचिंग हेअरबॅण्ड असो, पिना असो किंवा अगदी आशिकी नावाचा चित्रपट खुप गाजला होता तेंव्हा त्यातील केसांना बांधायचे फॅन्सी बो या सर्व गोष्टी ती अगदी हौसेने आणायची आणि माझे लाड करायची हे सर्व अजूनही लक्षात आहे.

तिच्या खास दिवशी काही आठवणी सांगाव्याशा वाटल्या म्हणून हि पोस्ट!

आईच्या हातचे काही पदार्थ असे आहेत की ते तीनेच करावेत आणि आपण मनसोक्त खावेत. त्यापैकी एक म्हणजे केक. पूर्वी ओवनवगैरे तर नव्हताच पण तव्यावर वाळु ठेवून त्यावर रिंगच्या आकाराचा केक होईल अशा भांड्यात तयार केलेला केक म्हणजे माझ्यासाठी ती ट्रीट असायची आणि तेंव्हा माझा भाऊ अभिषेक देखील नसल्याने शेअरिंगचा प्रश्नच नसायचा. त्यामुळे केक मस्त ताव मारून खायचे मी! आई ला अंड्याचा वास देखील सहन होत नाही तरी ती प्रेमाने तो केक तयार करायची. मग कधी त्यात टुटीफ्रूटी, तर कधी बडिशेपच्या रंगीत गोळ्या तर कधी जेम्सच्या गोळ्या लावून सजावट असायची. या तीनपैकी एक केक म्हणजे एकदम खास काहीतरी असेल तरच असायचा. ती केक तयार करत असताना मला पण काहीतरी मदत करायची म्हणून माझी लुडबुड हि असायची. केकचे मिश्रण एकदा मोल्ड मधे भरले आणि त्याची रवानगी तव्यावर झाली की केक तयार झाल्याचा एक खमंग वास येईपर्यंत मी शेगडीच्या बाजुलाच बसलेली असायचे. एकदा असच केक करायची माझी भुणभुण ऐकून तिने सकाळी ऑफिस ला जायच्या आधी आज घरी आले की केक तयार करेन असं सांगितलं. शाळेतून आल्यावर कधी एकदा आई येते या विचारात तिची खिडकीत बसून वाट पाहणे चालू होतं. ती घरी आल्यावर लगेचच केकसाठीच आणलेल सामन तिच्याकडून घेऊन ओटयावर ठेवत मी कधी केक तयार होईल?  विचारलं. "तू खेळायला जा तिथुन येईपर्यंत केक होईल तयार!" असं मला सांगून ती तिच्या कामांना लागली आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायला पळाले. आम्ही रोज सर्व खेळून, थोड्या वेळ गप्पा मारून घरी जायचो. त्या दिवशी आई केक करणार याचा इतका आनंद झाला होता की गप्पा मारताना मित्रमैत्रिणींना ओघात आई केक करत आहे हे सांगितलं आणि पटकन कोणीतरी "आम्ही येऊ का खायला?" विचारलं. हो तुम्ही सगळे या असं मी सांगितलं. मग काय सगळेच खुष! घरी सगळे जायच्या आधी सगळ्यांना घेऊन मी आमच्या घरात हजर आणि आईला सांगितलं आई सगळ्यांना केक खायला मी घरी घेऊन आले. आईने मस्त सर्वांना वाटीत गरम गरम केकचे छान तुकडे करून खायला दिले. बघता बघता केक अर्ध्यापेक्षा जास्त संपला. केक चे कौतुक करत मुलं आपापल्या घरी गेली पण मी मात्र वाटी हातात घेऊन आई अजुन केक? असं विचारलं. आई म्हणाली आता मला आणि बाबांना एक तुकडा एवढाच उरला आहे. "अग असा कसा संपला म्हणून मी जरा तोंड वाकडच केलं." आईने परत लवकरच करेन असं म्हणून माझी समजूत घातली आणि परत दुसऱ्या दिवशी केक तयार केला देखील! हा प्रसंग आम्ही अजूनही आठवून हसतो.

तशीच एक लक्षात राहिल अशी गोष्ट म्हणजे, आईकडे अनेक कलागुण आहेत किंवा ती तिचे अनेक छंद जोपासते त्यातील एक म्हणजे विणकाम. आईने आजपर्यंत अनेकांना स्वेटर पायमोजे, बाळंतविडयावर देण्यासाठी स्वेटरचे सेट विणुन दिले आहेत. मीदेखील कायम तिने विणलेले स्वेटर, जॅकेट्स घातले आहेत. मी लहान असताना एकदा ती अशीच कोणासाठी तरी स्वेटर विणत होती. माझ्याकडे लहानपणी जी बाहुली होती तिच्याशिवाय माझं पान हलायचं नाही. त्या दिवशी आईला विणकाम करताना पाहुन मी आईकडे हट्ट सुरु केला. कि सगळ्यांसाठी स्वेटर विणत असते माझ्या बाहुलीसाठी पण विण. आधी मी उगाच काहीतरी हट्ट करते असं आईला वाटलं पण नंतर एकंदरीत माझा त्यासाठीचा पाठपुरावा पाहुन तिने माझ्या बाहुलीसाठी जांभळा आणि पांढऱ्या रंगाचा छान स्वेटर विणुन दिला. हि झाली लहानपणीची आठवण. पण आईने विणलेला स्वेटर हवा हा हट्ट माझ्या या वयात पण कायम राहिला.  काही महिन्यांपूर्वी कोणासाठी स्वेटर विणताना पाहुन परत मला पण स्वेटर विण हा हट्ट मी माझ्या वयाच्या 43व्या वर्षी केला आणि माझ्या आईने तिच्या 68व्या वर्षी देखील तेव्हढ्याच उत्साहाने पूर्ण केला. शेवटी हिच ऊब आयुष्यभर आपल्यासोबत राहते.

काल तिचा वाढदिवस होता तिला सरप्राईज द्यायच अचानक ठरवलं आणि तिला भेटायला ठाण्याला यायला निघाले पण या सर्व गडबडीत तिने विणलेल्या स्वेटर चा फोटो क्लिक करायचा राहिला. पण, मला रात्री अचानक दरवाज्यात पाहुन तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन आणि तिच्या तोंडून माझ्यासाठीची अग बये, बघ कशी दुष्ट आहेस सकाळी फोन वर विचारलं तेंव्हा पण असा काय विचारतेस? मधल्या वारी शाळा, बाकी रूटीन चालू असताना कशी येईन! हि माझीच वाक्य थोडं चिडवुन, वेडावुन म्हणून दाखवली. ते पाहताना जाम मज्जा वाटली आणि आम्ही खुप हसलो.

साडी आणि चितळे यांच्याकडील अंजीर रोल तिला भेट दिली. हे क्षण जगताना मनाला वेगळच समाधान मिळत होतं. असं प्रेम अशी ऊब कायम आम्हाला मिळो आणि त्यासाठी आईला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच 33 कोटी देवांकडे तिच्या वाढदिवसानिमित्त परत एकदा प्रार्थना... 🙏🏻🙏🏻🙏🏻

वाढत्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई !!!🎂🍰🍫💐



©️स्वप्ना शेंडे भिडे.

No comments:

Post a Comment